Wed, March 29, 2023

रस्त्यानंतर चरासाठी तिसऱ्यांना निविदा
रस्त्यानंतर चरासाठी तिसऱ्यांना निविदा
Published on : 22 December 2021, 3:13 am
रस्त्यानंतर चरांसाठी तिसऱ्यांदा निविदा
महापालिकेकडून तीन वर्षांसाठी ५०५ कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : रस्तेदुरुस्तीप्रमाणे रस्त्यांवरील चरांच्या दुरुस्त्याही आता वादग्रस्त ठरू लागल्या आहेत. चरांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने तिसऱ्यांना निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठी महापालिका तब्बल ५०५ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
चर दुरुस्तीसाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी निविदा मागवल्या होत्या. त्यात कंत्राटदारांनी ३० ते ३५ टक्के कमी दराने निविदा भरल्यानंतर फेरनिविदा मागवण्यात आल्या; मात्र या फेरनिविदांमध्ये कंत्राटदारांनी संगनमत केल्याचा आरोप झाल्याने पालिकेने या निविदा रद्द केल्या आणि पुन्हा नव्याने निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठी महापालिका कंत्राटदाराची नियुक्ती करणार असून त्यासाठी ५०५ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे.
भूमिगत सुविधांसाठी अनेक वेळा रस्ते खोदावे लागतात. वर्षाला साधारण ४०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांचे खोदकाम केले जाते. खोदलेल्या रस्त्यावरील चर दुरुस्त करण्यासाठी महापालिकेकडून कंत्राटदार नियुक्त केले जातात. त्यासाठी या निविदा मागवल्या आहेत.
-----
कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस
दुसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी संगनमत केल्याचा आरोप झाल्यानंतर पालिकेने ती निविदा प्रक्रिया रद्द केली; मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते.
------
कारवाई झालीच पाहिजे
भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी चर दुरुस्तीतील संगनमताचा मुद्दा लावून धरला होता. तेव्हा निविदा अंतिम टप्प्यात पोहचल्या नाहीत, म्हणून घोटाळा झाला नाही; मात्र घोटाळ्याचा निश्चित प्रयत्न होता. भाजपने मागणी केल्यामुळे ती निविदा रद्द झाली, पण घोटाळ्याचा प्रयत्न हाही गुन्हा मानून त्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
----
परिमंडळ निहाय खर्च -
परिमंडळ -खर्च कोटीत
एक - ८०
दोन - ७०
तीन - ६०
चार - ९०
पाच - ७५
सहा - ३५
सात - ९५