Tue, March 21, 2023

किती दिवस दुखवटा पाळणार?
किती दिवस दुखवटा पाळणार?
Published on : 22 December 2021, 3:17 am
किती दिवस दुखवटा पाळणार?
एसटी संपावरून न्यायालयाचा संघटनेला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कामगार नेत्यांनी एसटी संप मागे घेत असल्याची घोषणा केली असली तरी अद्याप अधिकृतपणे याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच आहे, असे आज एसटी महामंडळातर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले; तर हा संप नसून सहकाऱ्यांच्या मृत्यूचा दुखवटा आहे, असा खुलासा एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आला; मात्र दुखवटा अनिश्चित कालावधीसाठी असू शकत नाही, आणखी किती दिवस असा दुखवटा पाळणार, असा सवाल न्यायालयाने केला.
एसटी संपकऱ्यांच्या भूमिकेवर आज न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचे दु:ख असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी दुखवटा पाळणेही नैसर्गिक आहेच, मात्र हा दुखवटा अनिश्चित कालावधीसाठी असू शकत नाही, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. आता नाताळची सुट्टी आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत; पण अन्य प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण यांचे या संपामुळे अतोनात हाल होत आहेत. या प्रवाशांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे कुंटुंबीयदेखील आहेत. त्यामुळे विचार करा आणि एक पाऊल पुढे टाका, असे आवाहन न्यायालयाने केले.
संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील एसटी संप मागे घेण्याच्या घोषणेविषयी पदाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही, असे खंडपीठाला सांगितले. या पार्श्वभूमीवर आता सुमारे ४८ हजार कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत अवमान याचिकेच्या सुनावणीबाबत प्रत्येक डेपोत माहिती द्यावी. यासाठी माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. याचिकेवर ५ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
विलीनीकरणावर विचार सुरू
एसटी विलीनीकरणावर विचार सुरू आहे; मात्र तातडीने निर्णय घेण्याचा कर्मचारी संघटनेचा आग्रह असून हे चुकीचे असल्याचे राज्य सरकारने आज खंडपीठात सांगितले. तसेच, एसटी सध्या आर्थिक संकटात आहे. तिची रोजची उलाढाल होणे आवश्यक आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या पूर्ण झाल्या आहेत, असे सरकारकडून सांगण्यात आले.