मास्टर लिस्टविषयी अधिकाऱ्यांमध्ये नाही ताळमेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मास्टर लिस्टविषयी अधिकाऱ्यांमध्ये नाही ताळमेळ
मास्टर लिस्टविषयी अधिकाऱ्यांमध्ये नाही ताळमेळ

मास्टर लिस्टविषयी अधिकाऱ्यांमध्ये नाही ताळमेळ

sakal_logo
By
मास्टर लिस्टबाबत अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही संक्रमण शिबिरातील नागरिकांना घराची प्रतीक्षा सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २२ : गृहनिर्माण विभागाने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मास्टर लिस्टवर घातलेली स्थगिती उठवली आहे. त्यानंतरही म्हाडा अधिकाऱ्यांनी हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना घरांचे वाटप करणे थांबवलेले आहे. मुख्य अधिकारी मास्टर लिस्टची कामे सुरू असल्याचे सांगतात; मात्र इतर अधिकारी संबंधित कामे ठप्प असल्याचे सागंत आहेत. हा गोंधळ दूर करण्यासाठी म्हाडा अधिकाऱ्यांमध्येच ताळमेळ नसल्याने मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. मूळ उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नसल्याने संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येते. मंडळाकडून हक्काचे घर मिळेल, या आशेवर येथील रहिवाशी गेली चार दशके संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात; मात्र यामध्ये दलालांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टला स्थगिती दिली होती. मास्टर लिस्टवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी होऊ लागल्याने गृहनिर्माण विभागाने नुकतीच ही स्थगिती उठवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मास्टर लिस्टची सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या रहिवाशांचे अर्जही स्वीकारण्यात येत नाहीत. तसेच पात्र अर्जदारांना घरांचे वाटपही होत नसल्याने रहिवाशी म्हाडा कार्यालयात चकरा मारत आहेत; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मास्टर लिस्टची कोणतीही कामे करायची नाहीत, अशा सूचना दिल्याने आम्हाला हक्काचे घर मागणाऱ्या नागरिकास न्याय देता येत नसल्याची खंत काही अधिकारी खाजगीत व्यक्त करत आहेत. याविषयी मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांना विचारले असता त्यांनी मास्टर लिस्टचे सर्व काम सुरू असल्याचे सांगितले. -- मंडळाला अतिरिक्त गाळे प्राप्त झाले आहेत. हे गाळे पात्र नागरिकांना द्यायला हवेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. - विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ.