मुंबई
एटीएम स्किमरद्वारे कोट्यवधींची लूट
एटीएम स्किमरद्वारे कोट्यवधींची लूट
डायघर पोलिसांनी त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या; ४०० जणांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने कार्डवरील डेटा चोरणाऱ्या त्रिकुटाच्या डायघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने बनावट एटीएम तयार करून ४०० हून अधिक नागरिकांची कोट्यवधींची लूट केली. या टोळीकडून पोलिसांनी स्किमर मशिन, कार्ड रायटर, लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड, रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जमील अहमद मो दरगाही शेख (२२), गोविंद सिंग (२५), आशिषकुमार सिंग (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १० जुलै २०२१ ला एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा नातू दहिसरच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना, त्याला तीन अनोळखी व्यक्तींनी बोलावून बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्डमधील डेटा चोरून आरोपींनी त्याला ते कार्ड परत केले. त्यानंतर ११ ते १३ जुलै या कालावधीत वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून ७३ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास करून तिघा आरोपींना अटक केली. यावेळी आरोपींकडून १८ हजार किमतीचे स्किमर मशिन, ५ हजार किमतीचे रायटर, १५ हजार किमतीचा लॅपटॉप, ४२ एटीएम कार्ड, २२ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमात हस्तगत करण्यात आला. आरोपींकडून जप्त केलेल्या लॅपटॉपचा तपास केला असता ४१४ एटीएम कार्डचा चोरलेला डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. यादरम्यान आता संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून फसवणूक झालेल्या नागरिकांची माहिती प्राप्त करून कार्यवाही केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींची मोडस ऑपरेंडीटी -
आरोपी डार्कवेवरून एटीएम कार्ड स्किमर, कार्ड रायटर खरेदी करून लॅपटॉपद्वारे एटीएम कार्ड क्लोन करीत होते. त्याकरीता जुने बंद पडलेले किंवा मुदत संपलेले एटीएम कार्डवरील डेटा रायटरच्या साह्याने ब्लॉक करून, त्यावर चोरी केलेला डेटा कॉपी (राईट) करून कार्ड क्लोन करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सद्यस्थितीत बँका आधुनिक पद्धतीच्या एटीएम मशीनचा वापर करीत असून, क्लोन कार्ड आधुनिक एटीएम मशीनमध्ये चालत नसल्याने ज्या ठिकाणी जुने पारंपरिक पद्धतीचे एटीएम मशीन आहेत त्या एटीएममधून पैसे काढले जात होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.