एसटी कामगारांचे
विलिनीकरण शक्य नाही
कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे प्रतिपादन
मुंबादेवी, ता. २८ (बातमीदार) : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून वेतनवाढ करण्यात आली आहे; मात्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन एसटीची सेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करावी, असे आवाहन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.
काळबादेवी येथील कापड बाजार छत्री बाजार युनियनकडून नुकताच बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेसाठी तसेच कामगारांसाठीही एसटी महामंडळ अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन पावले मागे येऊन संपाचा तिढा सोडवावा व लवकरात लवकर कामावर हजर होऊन लोकांचा एसटी प्रवास पुन्हा सुरू करावा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. माथाडी कामगारांचा घरांचा प्रश्न तसेच इतर समस्याही सोडवण्याचा प्रयत्न करू. मंत्रालय येथे आणणे शक्य नसले; तरी मजुरांसाठी येथे दरबार भरवू, असे कडू म्हणाले. यावेळी व्यासपीठावर माथाडी नेते डी. एस. शिंदे, प्रमोद देशमुख, सुभाष सुर्वे, संभाजी कोळेकर, सुरेश कोळेकर उपस्थित होते.