संचारबंदीत नववर्षाचे स्वागत
मरिन ड्राईव्ह समुद्रकिनाऱ्याला खाकी झालर
दिनेश मराठे
मुंबादेवी, ता. १ : शहरात संचारबंदीत नववर्षाचे स्वागत झाले. २०२१ वर्षाच्या अखेरच्या दिवशी आणि नववर्षाच्या प्रारंभ दिनी मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचे सावट, तसेच कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्याने दक्षिण मुंबईत पोलिसांचा मोठा फौजफाटा महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. दरवर्षी ३१ डिसेंबरला समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होत असल्याने यंदा पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे किनाऱ्यांना खाकी झालर लागली होती.
कुलाब्यात काही हॉटेल सजली होती, पण ग्राहकांची मर्यादित संख्या पाहता नववर्ष स्वागताचा व्यवसाय किती होईल, अशी चिंता व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ख्रिस्ती धर्मीय नववर्ष स्वागतास चर्चेसमध्ये पारंपरिक वेषात प्रार्थनेसाठी जाताना दिसत होते. कुलाबा कफ परेड येथे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास म्हामुणकर आणि सहकारी बंदोबस्तावर होते. रश ड्रायव्हिंग, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हमुळे अपघात होऊ नये तसेच रात्रीच्या संचारबंदीचा भंग होऊ नये म्हणून आम्ही सक्तीने कायदा राबवत आहोत, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालयासमोर मुंबई पोलिसांची सुसज्ज हत्यारबंद क्विक रिस्पॉन्स टीम उपनिरीक्षक गणेश खांडे यांच्या नेतृत्वात बंदोबस्तावर तैनात होती. ३१ च्या मध्यरात्रीपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट यांना परवानगी देण्यात आल्याने मद्यशौकीन खुशीत असल्याचे पाहायला मिळत होते.
...
समुद्र किनाऱ्याला खाकी झालर
नववर्ष स्वागतास गर्दी होऊ नये म्हणून मरिन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावर बेरिकेट्स लावून वाहने तपासत पोलिसांची गस्त सुरू होती. दर शंभर फूट अंतरावर पोलिस तैनात होते. वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ कोळेकर, पोलिस निरीक्षक मंगेश चव्हाण, गोकुळ दगडखैर, उपनिरीक्षक राहुल कदम इथे कार्यरत होते. महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी शेडबाळे यांचा मरिन ड्राईव्ह समुद्र किनारी राउंड सुरू होता. २०० पोलिस ३० अधिकारी इथे बंदोबस्तावर होते.
...
सूचनांचे पालन करीत नववर्ष साजरे
मच्छीमार कॉलनी, बधवार पार्क येथेही पोलिस पहारा होता. मच्छीमार कोळी समाजाचे नेते देवेंद्र दामोदर तांडेल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारच्या सूचनांचे पालन करीत नववर्ष आनंदात साजरे करीत आहोत, असे सांगितले. आझाद मैदान पोलिसांची मेट्रो सिनेमा छगन बाप्पा पेट्रोल पंप येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्या नेतृत्वात नाकाबंदी सुरू होती. निरीक्षक नीलेश बागूल, शैलेश सूर्यवंशी आणि उपनिरीक्षक गिरीश जोग वाहनांची तपासणी करीत होते.
पोलिस अधिकाऱ्याचे डोळे भरून आले...
गेटवे ऑफ इंडियाच्या द्वारावर प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. ट्राफिक पोलिस उपनिरीक्षक नामदेव काळे आणि सहकर्मी वाहनाचे नियंत्रण करीत होते तर दुसरीकडे कुलाबा वाहतूक महिला वरिष्ठ निरीक्षक मुबारक शेख या सर्वत्र देखरेख ठेवीत सूचना देत होत्या. रस्त्यावरील मुलांना त्यांनी खाऊ वाटप करून शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस पोलिस आपल्याला धरतील या भीतीपोटी मुले लांब पाळत होती, पण खाऊने आनंदित झाली. हॅपी न्यू इयर ओरडून त्यांनी मुबारक यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हा मुबारक यांचे डोळे भरून आले. कुलाबा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सावंत यांनी आधी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली.
...
जल्लोषाला स्वल्पविराम
तरुणाईच्या नववर्षाचे स्वागत, आनंद, जल्लोष करण्याच्या परंपरेला यंदाही कोरोनामुळे स्वल्पविराम लागला. मोठा आनंद कोरोनामुळे हिरावल्याची नाराजी प्रियांका सिंग, स्मिता मयेकर, रेश्मा कोचरेकर, नेहा प्रभुलकर यांनी व्यक्त केली. तसेच या कोरोनाला आपण निश्चित हरवू, आता लसीकरणाचे दोन डोस झाले असून लवकरच बूस्टरही मिळेल, त्यामुळे चिंता नाही, असेही त्यांनी सांगितले.
...