भटक्या श्वानासोबत क्रूरकृत्य
अंधेरीतील घटनेमुळे प्राणिप्रेमींमध्ये संताप
गोरेगाव, ता. १ (बातमीदार) ः अंधेरीतील कपासवाडी येथे २६ डिसेंबरच्या रात्री एका भटक्या श्वानाचे लिंग कापून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. विविध प्राणिप्रेमी संघटनांसह ‘पेटा’ने पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडे संताप व्यक्त करीत अशा घटनांना पायबंद करण्यासाठी कायमची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जखमी श्वानाला परेलच्या बॉम्बे सोसायटी फॉर दि प्रिवेन्शन ऑफ क्रुयालिटी टू अनिमल्स (एसपीसीए) मध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तातडीची शस्रक्रिया करीत श्वानाला जिवावरील संकटातून वाचविले. या क्रूर कृत्याबाबत संताप व्यक्त होत आहे. पशुपालन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात पशुक्रूरता निवारण अधिनियम १९६० अन्वये तक्रार दाखल केली आहे. कपासवाडीमधील पशू प्राणिप्रेमी व मानवतेच्या भावनेतून भटक्या जनावरांना अन्न खाऊ घालणाऱ्या काही व्यक्तींनी ही घटना उघडकीस आणली होती. भारतीय पशुकल्याण बोर्डाचे अधिकारी मितेश जैन यांनी हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तपास लावण्यासाठी पोलिसांना परिसरातील सीसी टीव्ही फुटेज पाहण्याची सूचना केली असून आम्ही या कामी पोलिसांना मदत करीत आहोत, ही घटना क्रूरतेचे उदाहरण असून असे कृत्य करणारी व्यक्ती नक्कीच माथेफेरू, विक्षिप्त असली पाहिजे, असे ते म्हणाले.
...
केवळ पन्नास रुपयांचा दंड
या घटनेचे पडसाद मुंबईत उमटू लागले असून प्राणिप्रेमी संघटना यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली आहे. प्राण्यांबाबतीत गुन्हे करणाऱ्यांना सक्त सजा करण्यासाठी पशुकायद्यात, पीसीए १९६० च्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कारण पशुक्रूरतेमध्ये दोषी असणारे गुन्हेगार केवळ पन्नास रुपयांचा दंड भरून आपली सुटका करून घेत आहेत. जोपर्यंत कडक शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत प्राण्यांबाबत असे प्रकार घडतच राहतील, असे संघटनांचे मत आहे.
...