कंगनाला दिलासा नाहीच
मानहानीचा दावा अन्यत्र हलवण्यास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेला खटला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातून अन्यत्र वर्ग करण्याची कंगना राणावतची याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने पुन्हा अमान्य केली आहे. त्यामुळे अख्तर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला अंधेरी न्यायालयातच सुरू राहील.
कंगनाने वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्यावर वादग्रस्त आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नसून यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा मानहानीचा दावा अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांनी केला आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने कंगनाला हजर राहण्याचे समन्स बजावले होते; मात्र या दाव्याची कारवाई नियमानुसार आणि बेकायदेशीरपणे होत आहे, असा आरोप करून ही सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात यापूर्वी कंगनाने अर्जाद्वारे केली होती; मात्र हा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यामुळे कंगनाने सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला होता. शुक्रवारी न्यायालयाने तिची मागणी नामंजूर केली.
अंधेरी न्यायालयात किमान सहाहून अधिक वेळा कंगना सुनावणीला जाणीवपूर्वक गैरहजर राहिली होती. एकदा तिची मागणी अमान्य झाल्यावर याच मुद्यावर नव्याने याचिका करण्याची आवश्यकता नव्हती, असा युक्तिवाद अख्तर यांच्या वतीने ॲड. जय भारद्वाज यांनी न्यायालयात केला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी कंगनाची याचिका नामंजूर केली.
दरम्यान, अख्तर यांनी बदनामीचा दावा केल्यानंतर कंगनानेदेखील अख्तर यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. अभिनेता ऋतिक रोशन याच्यासोबतच्या वादाबाबत अख्तर यांनी सूचना केल्या होत्या, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.