बॉलीवूडला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा
नोरापाठोपाठ मृणाल ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई, ता. १ ः बॉलीवूड इंडस्ट्रीला पुन्हा एकदा कोरोनाने विळखा घातलेला पाहायला मिळतो आहे. काल अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, अनिल कपूरची लेक रिया कपूर व तिचा पती करण बुलानी अशा चौघांना कोरोनाची लागण झाल्यचे स्पष्ट झाले आहे. आता बॉलीवूडची ‘डान्सिंग क्वीन’ नोरा फतेही आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत.
नोराच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच नोरा क्वारंटाइन झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे; तर मृणाल ठाकूर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. मृणालने सांगितले, की ‘‘माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता माझ्यात कोरोनाची हलकी लक्षणे आहेत, पण मला बरे वाटत आहे. मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्सकडून देण्यात आलेला प्रोटोकॉल फॉलो करत आहे. जर तुमच्यापैकी कुणी माझ्या संपर्कात आले असाल तर कृपया कोरोनाची टेस्ट करा, सुरक्षित राहा.’’ बॉलीवूडमध्येही कोरोना संक्रमण वाढताना दिसत आहे. काही दिवसांआधी करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, मेहर कपूर या चौघी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. यानंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला या दोघांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. अर्जुनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो पॉझिटिव्ह आढळला होता.