मत-मतांतरे
शाळा बंद कराव्यात
राज्यभरात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत ४५४ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. मुंबई पोलिसांच्या नव्या निर्बंधांनुसार संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे. असे असताना राज्यात शाळा मात्र सुरू आहेत. पालक कोरोनाच्या भितीमुळे मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नाहीत. राज्यात ११ ते २० वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मग शाळा का सुरू ठेवल्या आहेत? प्रथम मुलांचे लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याअगोदरच शाळा बंद केल्यास मुले सुरक्षित राहतील. मुलांमध्ये संसर्ग वाढला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शाळेच्या व्यवस्थापनावरच आरोप केले जातील.
विवेक तवटे, कळवा
--
नववर्षाचे स्वागत, सुखद की दुःखद?
१ जानेवारी कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी जन्माला आलेले मूल स्वतःला भाग्यवान समजते. पाश्चिमात्य देशांत नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या काही महिला आपले मूल १ जानेवारीला जगात यावे म्हणून सिझरिंगचा पर्याय निवडतात. १ जानेवारीला ज्यांचा वाढदिवस असतो ते तो धूमधडाक्यात साजरा करतात. अनेक जण नवे संकल्प म्हणून १ जानेवारीपासून ध्येयाच्या दिशेने पावले टाकतात. मात्र, याच दिवसाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी दारू ढोसण्याची आणि पार्ट्या करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून पडली आहे. जल्लोषाच्या नादात अमली पदार्थांचे सेवन केले जाते, छेडछाडीचे प्रकार घडतात, मारामाऱ्या होतात, सूड उगवले जातात, दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे अपघात घडतात... अपघातांत अनेकांना जीवही गमवावा लागतो. माणसाला मृत्यूच्या दारात नेणारे, आयुष्यभराचे व्यसन लावणारे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारे, भोगवादाला खतपाणी घालणारे हे कसले नववर्षाचे स्वागत?
- जगन घाणेकर, घाटकोपर
दुर्मिळ साहित्य दुर्लक्षित!
निधी आणि जागेअभावी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाला लाखों वर्षांपूर्वीचे दुर्मिळ साहित्य जतन करण्यात अडचणी येत आहेत. सिंधू संस्कृतीच्या शोधासाठी केलेल्या उत्खननांमुळे हे महाविद्यालय जागतिक पातळीवर विख्यात आहे. भारत म्हणजे पुरातन वस्तू आणि वास्तूंची खाण असलेला प्रदेश आहे. उत्खननात येथे ज्या वस्तू मिळतात त्यावरून हे लक्षात येते. याचे गांभीर्य जगाला आहे; पण भारताला नाही असे का म्हणू नये? याच पुरातन वस्तू अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांत मिळाल्या असत्या तर त्यांचे जतन त्यांच्याकडून उत्तमप्रकारे झाले असते. तसेच याविषयी अधिक संशोधन होण्यासाठी निधीची कमतरताही भासू दिली नसती. त्याही पुढे जात त्यांनी जगासमोर हा भाग आणण्यासाठी नवीन वाहिनीही चालू केली असती. असे करण्याची संधी भारतालाही आहे. यासाठी सरकारी स्तरावर भक्कम आर्थिक पाठबळ मिळत राहणे निकडीचे आहे. तसे झाले तरच दुर्लक्षित राहिलेला पुरातत्त्व विभाग प्रकाशात येईल अन्यथा त्याची अवस्था यापूर्वी आज जशी आहे तशीच पुढेही राहील आणि हा महत्त्वाचा विभाग लाल फितीच्या कारभारात नेहमीप्रमाणे धूळच खात राहील. देशातील प्राचीन मंदिरे, विशेषतः महाराष्ट्राला लाभलेले गड-किल्ले यांची स्थिती विदारक आहे. यांच्या उत्तम देखभालीतून भारत पर्यटनाच्या क्षितिजावर लक्षवेधी ठरला असता.
- जयेश राणे, भांडुप