नववर्षात ७ हजार ५६० पदांची होणार मेगाभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती
मुंबई, ता. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना खुशखबर दिली आहे. यंदाच्या वर्षात राज्याच्या विविध विभागांमध्ये तब्बल सात हजार ५६० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. २०२१ मध्ये या जागा रिक्त असल्याची आणि त्या भरण्यासाठीची माहिती आयोगाने दिली असल्याने परीक्षांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवांरासाठी हे नववर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील काही महिन्यांमध्ये सरळ सेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र ‘एमपीएससी’ने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार राज्याच्या २५ विभागांमधील तिन्ही गटांच्या एकूण सात हजार ५६० जागा रिक्त आहेत. यातील चार हजार ३२७ पदांसाठीच्या जाहिराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षा पुढील काही महिन्यांत होणार आहेत. याचबरोबर उर्वरित तीन हजार २३३ जागांसाठीच्या परीक्षादेखील याच वर्षी घेण्यात येणार आहेत.
---
एवढ्या जागा रिक्त
सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षा अशा दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन विभाग (२७३ /७८४), कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग (७७६/ १४८), गृह विभाग (६४७ /५१२), वित्त विभाग (४ /३५२), सार्वजनिक आरोग्य विभाग (९३७ सरळसेवा), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (१५७२ सरळसेवा), जलसंपदा (२५/ २९८) या विभागांमध्ये आहेत. यासंदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर येत्या वर्षात या सर्व पदांसाठी परीक्षा घेऊन ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा. लवकरात लवकर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी मागणी ‘एमपीएससी’ समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी केली आहे.