मुंबई विमानतळावर कोरोनाचा शिरकाव
सीमा शुल्क विभागातील १५ अधिकारी कोरोनाबाधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महापालिका आणि अदानी ग्रुपच्या माध्यमातून आरटीपीसीआर तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये सीमा शुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे; मात्र इतर अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी प्रलंबित असल्याने कोरोनाबधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
विमानतळावर करचुकवेगिरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे काम सीमा शुल्क विभागाचे अधिकारी करतात. दैनंदिन विमानमार्गाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांपैकी संशयित प्रवाशांची तपासणी केली जाते. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संपर्कात या अधिकाऱ्यांना यावे लागते. त्यातून हा संसर्ग झाला असण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.
यामध्ये सीमा शुल्क विभागातील आयुक्त, सहायक आयुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकाऱ्यांची तपासणी आणि त्यांचे अहवाल प्रलंबित असून, सोमवारपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यतासुद्धा व्यक्त करण्यात येत आहे; मात्र सीमा शुल्क विभागाकडून अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही.