वस्त्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव
मुंबईत तब्बल चार महिन्यांनी २४ हजार घरे प्रतिबंधित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : डिसेंबरच्या अखेरपासून मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली असून महापालिकेने केलेल्या जनुकीय चाचणीत ओमिक्राॅनचा समूह संसर्ग होत असल्याचे उघड झाले आहे. त्यातच तब्बल चार महिन्यांनी वर्षाच्या अखेरीस ११ वस्त्यांमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने त्या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. वस्त्यांमधील २४ हजार घरे प्रतिबंधात आहेत.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत झोपडपट्ट्यांमध्ये कोविडचा फारसा प्रार्दुभाव झाला होता. ऑगस्टनंतर वस्त्यांमधील रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या नगण्या होती; तर ३१ डिसेंबरला ११ वस्त्यांमध्ये कोविडचा शिरकाव झाला असून त्या प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. कुर्ला एल प्रभागात सात, ग्रँट रोड-मलबार हिल, ताडदेव डी प्रभागात तीन आणि वरळी, प्रभादेवी जी दक्षिण विभागात एक प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील १२८ पूर्ण इमारती सील असून ३ हजार २० मजले सील आहेत. संपूर्ण मुंबईतील १ लाख ८० हजार घरांतील तब्बल सात लाखांवर रहिवासी निर्बंधांत आहेत. दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर दहा रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील करण्यात येत आहे; तर झोपडपट्टीमध्ये पाच ते दहा रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. यानुसार तब्बल १८ हजार इमारतींमध्ये १० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आल्यामुळे प्रतिबंध मुक्त झाले होते. काही दिवसांपासून ‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन जाहीर झाला. यानंतर गेल्या दोनच दिवसांत कंटेनमेंट झोनची संख्या दोन वरून ११ वर पोहचली आहे.
दृष्टिक्षेपात -----
नागरिक निर्बंधात
- झोपडपट्टीतील २४ हजार घरे, १ लाख २३ रहिवासी निर्बंधात
- पूर्ण सील इमारतीतील १८ हजार घरे, ६८ हजार रहिवासी निर्बंधात
- सील मजल्यांमधील १ लाख ३९ हजार घरांमध्ये ५ लाख १३ हजार नागरिक निर्बंधात