एसटी कर्मचाऱ्यांकडून आझाद मैदान मोकळे
जमावबंदी लागू झाल्याने निर्णय, संपकऱ्यांच्या मुक्कामवर निर्बंध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १ : कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस मुंबईत वाढत असल्याने मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. जमावबंधीच्या कलम १४४ अंतर्गत आता आझाद मैदान सुद्धा रिकामे करण्यात आले आहे. मैदानातील रात्रीचा मुक्कामावर आझाद मैदान पोलिसांनी निर्बंध लावल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनाही रात्र आता इतरत्र काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्यातरी आझाद मैदान रात्रीचे रिकामे झाले आहे.
गेल्या २७ ऑक्टोबरपासून राज्यभरात एसटीचा संप सुरू आहे. तर मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनालाही सुमारे ५३ दिवस लोटले आहे. विलीनीकरणाचा न्यायालयात प्रलंबित असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी रात्रीचे मैदान, समुद्र किनारे, गार्डन आणि सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध लावल्याने आझाद मैदानात आता संपकऱ्यांना रात्रीचा मुक्काम करता येणार नाही. त्यामुळे आझाद मैदानातील संपकरी एसटी कर्मचारी आता मुंबईतल्या नातेवाईक आणि इतर ठिकाणी राहायला गेले असून, पोलिस प्रशासनाकडून सुद्धा परेल भागात संपकऱ्यांची संभागृहामध्ये व्यवस्था केली असून, विलीनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे.दैनंदिन सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एसटी कर्मचारी आझाद मैदानात येऊन आपला संप कायम ठेवणार असल्याचे अक्कलकोट आगारातील संपकरी कर्मचारी सविता पवार यांनी सांगितले आहे.