रुबल अग्रवाल यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार
अरुण बोंगिरवार फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कोरोनाकाळातत''हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुण्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे पालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना प्रशासकीय सेवेतील मानाचा समजला जाणारा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार प्राप्त झाला. कोरोना काळातील व्यवस्थापनाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला. अग्रवाल यांच्यासह गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
अरुण बोंगिरवार फाऊंडेशनच्या वतीने येत्या ६ जानेवारीला आयोजिलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल. पुण्यात मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे आली. रुग्णांसाठी बेड
व्यवस्थापनापासून उपचार व्यवस्था, जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीसह त्याच्या व्यवस्थापनात अग्रवाल यांचा पुढाकार होता. तसेच, खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेऊन रुग्णांवरील उपचारास व्यवस्थापनाला भाग पाडले. ज्यामुळे पुणे आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना धोका होऊ नये, म्हणून ऑक्सिजन बचतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला. अशातच खासगी रुग्णालयातील आक्सिजन संपल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या ९ रुग्णांना दीड तासांत पालिकेच्या रुग्णालयात आणण्याचे धाडस अग्रवाल यांनी केले होते.
चौकट -----
‘म्युकर’ उपचारासाठी विभाग
मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध करण्यावर त्यांचा भर होता. दुसऱ्या लाटेत पालिकेच्या रुग्णालयात ‘रेमडेसिव्हिर इंजक्शन’चा काळाबाजार रोखण्यासाठी अग्रवाल यांनी यंत्रणा उभारली होती. दरम्यान, म्युकरमायकोसिसच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी त्यांनी स्वतंत्र विभाग सुरू केला.