मध्य रेल्वेच्या रूळांशेजारी फुलांची बाग खुलणार

मध्य रेल्वेच्या रूळांशेजारी फुलांची बाग खुलणार

मध्य रेल्वेच्या रुळांशेजारी फुलणार बाग अतिक्रमण व अस्वच्छता रोखण्यासाठी उपक्रम सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : मध्य रेल्वेच्या रुळांशेजारी नेहमी कचऱ्याचा ढीग, घाण, सांडपाणी दिसून येते. त्यामुळे रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना या दुर्गंधीला सामोरे जावे लागते; परंतु मध्य रेल्वेने रुळाशेजारी रिकाम्या जागेत फुलांची शेती करून बागा फुलविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ, निटनेटका आणि सुगंधित करण्याचे नियोजन आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एकूण ११३ ठिकाणी सुमारे १५० एकर जमिनीवर फुलझाडे लावण्याची निविदा काढली आहे. या निविदामध्ये १४ कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. मध्य रेल्वेच्या अनेक जागा ओसाड पडून आहेत. त्यावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाचे वारंवार वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पूर्वी रेल्वे रुळांशेजारी रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे भाजीपाला पिकविला जात होता. त्यामुळे रेल्वेच्या जागेचे संरक्षण होत असे. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा रेल्वे रुळांशेजारील जागेत करता आला नाही. त्यामुळे त्यांनी सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला पिकविला. परिणामी, मानवी आरोग्यास हानीकारक असलेला भाजीपाला पिकविला जात असल्याने रेल्वेने ही योजना बंद केली. आता भाजीपाल्याऐवजी फुलझाडे लावण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. मध्य रेल्वेने फुलशेती करण्यासाठी निविदा काढली. यात १४ फुलशेती करणाऱ्या खासगी कंपन्यांनी रुची दाखविली आहे. फुलशेतीमध्ये गुलाब, झेंडू यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, या कंपन्यांना फुलशेतीसह औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत परवानगी हवी आहे. कोरफडीपासून अनेक उत्पादने होत असल्याने कोरफडीसारख्या औषधी वनस्पतीला बाजारात खूप मागणी आहे. --------------------------- या ठिकाणांवर होणार शेती मुंब्रा ते कळवा दरम्यानच्या १२ एकर परिसरात फुलशेती केली जाणार आहे. यासह कल्याण ते ठाकुर्ली आणि कल्याण यार्ड ते ठाकुर्ली पॉवर हाऊसमध्ये १० एकरात, ठाणे ते मुलुंड दोन एकरात, मुलुंड ते नाहूर दीड एकर, विक्रोळी ते घाटकोपर दोन एकर, दादर ते परळ दीड एकरात फुलशेती केली जाणार आहे. यासह ऐरोली- घणसोली, मानखुर्द-वाशी, ठाणे-तुर्भे, जीटीबी नगर, टिळकनगर, कुर्ला कारशेड, शीव-कुर्ला, कुर्ला-घाटकोपर, शहाड-कल्याण, बदलापूर-अंबरनाथ, वडाळा, एलटीटी, दिवा-डोंबिवली, नेरूळ-सीवूड्स या भागात फुलशेती केल्याने प्लॅस्टिक कचरा, घाण, दुर्गंधी दूर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com