‘स्पाईसजेट’मधील ४६३ कर्मचाऱ्यांना डच्चू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘स्पाईसजेट’ विमान कंपनीतील ड्रायव्हर, लोडर, सुपरवायजर आणि सफाईचे काम करणाऱ्या ४६३ जुन्या कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. ‘स्पाईसजेट’ व्यवस्थापनाने ही कामे खासगी कंपन्यांना दिल्याचा आरोप ‘ऑल इंडिया स्पाईस जेट स्टाफ एम्प्लॉईज असोसिएशन’ने केला आहे.
‘स्पाईसजेट’ने आजवर सुमारे ५५० कामगारांना बेकायदा पद्धतीने कामावरून काढून टाकले आहे. ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट’च्या नावाखाली कंपनीचे कायमस्वरूपी आणि अनेक वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कोरोना काळात काम नाकारण्यात आले. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसाठीची रक्कमही सरकारकडे जमा करण्यात आलेली नाही, असे असोसिएशनने म्हटले आहे.
‘स्पाईसजेट’विरोधात धरणे देण्यात आले आहे. व्यवस्थापनाविरुद्ध संघटितपणे लढा देण्यात येईल, असे असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश सावंत आणि सरचिटणीस राजेश पाटील यांनी सांगितले.
दोन ते दहा वर्षांपर्यंत सलग काम करणाऱ्या कामगारांना नोकरीत कायम करण्याच्या आणि सामाजिक सुरक्षिततेचा लाभ मिळवून देण्याच्या कामगारांच्या मागण्या असोसिएशनने केल्या आहेत. सहाय्यक कामगार आयुक्तांसमोर या मागण्या करण्यात आल्या आहेत. औद्योगिक न्यायालयात
हे प्रकरण प्रलंबित आहे.
...