वाढत्या संसर्गातही नगरसेवकांचा अभ्यास दौरा
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजन
पनवेल, ता. ४ (प्रतिनिधी) ः महापालिकेचे नगरसेवक चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी इंदूरला जाणारा आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाही दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत इंदूर महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती घेणे तसेच इंदूर पालिकेतर्फे जे प्रकल्प राबवले जातात, त्यांना भेटी देऊन चर्चा करण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्यावर जाणाऱ्या नगरसेवकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, महापालिका सभा, कामकाज, नियमाबाबत सखोल मार्गदर्शन, महिला व बालकल्याण समितीतर्फे करावयाची विविध कामे, समितीच्या अधिनियमामधील विविध कलमांखाली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंबंधी माहिती, पक्षांतर बंदी या बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पालिकेच्या तिजोरीतून प्रवासखर्च
१६ जानेवारी ते १९ जानेवारी असे चार दिवस होणार असलेल्या दौऱ्याला जाण्याचा प्रवास खर्च पनवेल महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान नगरसेवकांना थ्री टियर रेल्वे तिकीट तर पदाधिकाऱ्यांना २ टियर रेल्वे तिकीट देण्यात येणार आहे. शुक्रवारी ( ता.७) आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.