एक हजार फूट उंचीचा वधन-वानरलिंगी कडा सर
कल्याणच्या गिर्यारोहकांचा पर्यावरण वाचवा संदेश
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः नाणेघाटाच्या बाजूलाच असलेल्या जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे २०० फूट लांब असलेल्या वानरलिंगी सुळका या कड्यांमध्ये तब्बल हजार फूट खोल दरी आहे. हे अंतर झिप्लायनिंगच्या मदतीने कल्याणच्या भूषण पवार व नीतेश पाटील या दोघा गिर्यारोहकांनी पार करत पर्यावरण वाचवा, असा संदेश दिला आहे.
मानवाने स्वार्थासाठी गड, किल्ले, सुळक्यांचे उत्खनन करून त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन, यासोबतच पर्यावरणाचे देखील संवर्धन होणे आवश्यक असल्याने, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंगच्या सहाय्याने हे गड, सुळका सर करून सामाजिक संदेश देण्याचे काम केले जात असल्याचे गिर्यारोहक भूषण पवार यांनी सांगितले.
किल्ल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर ४५० फुटांचा वानरलिंगी सुळका दिसतो. सुरक्षिततेला प्राधान्य देत दोन्ही सुळक्यांचे टोक गाठून सुमारे २०० फूट लांबीचे हे अंतर दोघांनी पार केल्याचे भूषण यांनी सांगितले.
या मोहिमेत त्यांना एसएल ॲडव्हेंचरच्या लहू उघडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या गड-किल्ले, सुळके आदींचे मानवाने उत्खनन करून त्यांचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. त्यात सर्वप्रथम श्री हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी किल्ल्याचे. त्यांचे संवर्धन व पर्यावरण वाचविण्यासाठी आम्ही अशा ट्रेकचे आयोजन करत असल्याचे भूषण यांनी सांगितले.