प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By
अनुष्काचं लवकरच कमबॅक बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री अनुष्का शर्मा जवळपास दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर त्यातच ती व्यस्त होती; मात्र आता ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. तिचे चाहतेही तिच्या चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच अनुष्काने तीन नवे प्रोजेक्ट सार्इन केले आहेत. त्यात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत मोठमोठे कलाकारही झळकणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच अनुष्का ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका वेब शोमध्येदेखील दिसणार आहे. अनुष्काला नव्या वर्षात पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून तिचे चाहते फारच उत्सुक आहेत. .... ललित प्रभाकर आणि वैभव पंडित एकत्र राष्ट्रीय पुरस्कारविजेता अभिनेता ललित प्रभाकरने मराठी चित्रपटांबरोबरच रंगभूमी, मालिका आणि वेबसीरीज अशा सगळ्याच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत विविधांगी भूमिका त्याने साकारल्या आहेत. आता तो दिग्दर्शक वैभव पंडितबरोबर काम करतोय. अद्‍भुत क्रिएटिक्सने बनवलेल्या एका प्रोजेक्टसाठी तो आणि वैभव एकत्र आले आहेत. सध्या ललितचे ‘कलरफूल’, ‘झोंबिवली’ आदी चित्रपट तयार आहेत. ते कधीही पडद्यावर येण्याची शक्यता आहे. ललित सांगतो, ‘छोटा पडदा असो की मोठा, मी प्रत्येक ठिकाणी तेवढीच मेहनत घेतो. माझ्यातील १०० टक्के देण्याचा प्रयत्न मी करीत असतो. वैभवबरोबर काम करताना मला खूप मजा आली. आम्ही कोठेही तडजोड केलेली नाही.’ .... म्युझिकल हिट ‘शर्मिली’चा सुवर्णमहोत्सव ओ मेरी शर्मिली, खिलते हैं गुल यहाँ, आज मदहोश हुआ जाए रे, मेघा छाये आधी रात, कैसे कहे हम प्यार ने आदी एकाहून एक लोकप्रिय गाणी असलेला ‘शर्मिली’ चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ५० वर्षं झाली. सुबोध मुखर्जी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ३१ डिसेंबर १९७१ मध्ये तो प्रदर्शित झाला होता. समीर गांगुली दिग्दर्शित चित्रपटात शशी कपूर आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे राखीची चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. नासिर हुसेन, नरेंद्रनाथ, रणजित, कृष्णकांत, इफ्तेकार, जयश्री टी. आणि अनिता दत्ता अशा लोकप्रिय कलाकारांनीही तितकंच महत्त्वपूर्ण काम केलं आहे. चित्रपटाची कथा गुलशन नंदा यांची आहे. संवाद वजेन्द्र गौड यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण एन. व्ही. श्रीनिवास याचं आहे. कला दिग्दर्शन शांतिदास यांचं असून नीरज यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचं संगीत आहे. लोकप्रिय गाण्यांमुळे रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही ‘शर्मिली’ चित्रपट आजही लोकप्रिय आहे हे विशेष. .... विसिका फिल्म्स आता चित्रपटनिर्मितीत विसिका फिल्म्स प्रॉडक्शन हाऊस आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये नुकताच विसिका फिल्म्सचा भव्य लाँच सोहळा पार पडला. त्यात अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. सोहळ्यात ‘विसिका’च्या बॅनरखाली तयार होणाऱ्या आगामी चित्रपटाची घोषणाही करण्यात आली. कंपनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहेत. विसिका फिल्म्सच्या बॅनरखाली अभिनेता गोविंदा आणि करिश्मा कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘साजन चले ससुराल’चा सिक्वेल बनवण्यात येणार आहे. त्यासोबतच ‘सरोजिनी’ चित्रपटाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. तो हिंदी, तेलगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये बनवला जाणार आहे. ‘गीता गोविंदा’ हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली जाणार असून तो ओटीटीवर प्रदर्शित होईल. त्यासोबतच विसिका फिल्म्स प्रेक्षकांसाठी नाटक, बायोपिक, थ्रिलर्स आदी विविध फॉर्मेट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ... नववर्षातही अक्षयची धूम गेल्या सहा वर्षांपासून अक्षय कुमार आणि राणा राकेश बाली यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ निर्मिती कंपनीने प्रेक्षकांना उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या बॅनरखाली तयार झालेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट झाला आहे. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’, ‘मिशन मंगल’, ‘पॅडमॅन’, ‘चुंबक’ आणि ‘गुड न्यूज’ असे काही चित्रपट त्यांनी दिले. २०२२ मध्ये अक्षयचे ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’ आणि ‘ओह माय गॉड २’ चित्रपट ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ बॅनरअंतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतील, अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. तिन्ही चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत असून त्यात अक्षय वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. राणा राकेश बाली यांनी सांगितले, ‘प्रत्येक कथा सिनेमाद्वारे सांगता येते. चित्रपट प्रेक्षकांशी कनेक्ट झाले पाहिजेत. आम्ही चित्रपटांच्या माध्यमातून तोच प्रयत्न करत आहोत.’ .... तापसीही चढणार लग्नाच्या बोहल्यावर बॉलीवूडची हरहुन्नरी अभिनेत्री तापसी पन्नूच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांबरोबरच समीक्षकही कौतुक करतात. ती नेहमीच आपल्या खासगी आयुष्याला मीडियापासून दूर ठेवते. त्यामुळे ती विशेष चर्चेतही असते, पण सध्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आपण लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याचं तापसीने सांगितलं होते. तापसी कोणासोबत लग्न करणार आणि कुठे करणार, याचं गुपित कायम आहे. नुकत्याच एका मुलाखतीत २०२२ आपल्यासाठी खास ठरणार असल्याचं सांगत तापसीने लग्नाची थोडीशी कल्पना चाहत्यांना दिली आहे. एकंदरीत पाहता तापसी २०२२ मध्ये लग्नाच्या बोहल्यावर चढणार, अशी दाट शक्यता आहे. आता तिच्या चाहत्यांनी तिचा वर कोण असेल याचा शोध सुरू केला आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top