मिरा भाईंदरमधील नागरिकांनाही करमाफी द्यावी
सभागृह नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाचा लाभ मिरा भाईंदरमधील नागरिकांना देण्यात यावा, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जाहीर केला आहे. याच धर्तीवर मिरा भाईंदरमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता कर माफ करून इथल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महापालिकेतील सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मिरा भाईंदरमधील नागरिकांना सरकारच्या मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदरमधील नागरिकांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, प्रशासनाने तो विखंडित करण्यासाठी सरकारकडे पाठवला. राज्य सरकारने आजपर्यंत या प्रस्तावावर निर्णय घेतलेला नाही, असे दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.