ही बातमी वाचलेली नाही... आधी एक सेम बातमी वाचून गेली आहे. पुरोहित
-------------------------------------
लस न घेता पळ काढलेल्या
तरुणाचा अद्याप पत्ता नाही
कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या यांना रोखण्यासाठी राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, काही जण लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. डोंबिवलीतील लसीकरण केंद्रावरून नाव नोंदणी करून पळ काढलेला ऋषीकेश मोरे अद्यापि सापडलेला नाही. त्याचा केवळ मोबाईल क्रमांक पालिकेच्या आरोग्य विभागाकडे असून तो फोनच उचलत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे.
पालिकेच्या नेहरू मैदान लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी नाव नोंदणी करून ऋषीकेश मोरे या तरुणाने २३ डिसेंबरला लस न घेताच पळ काढला. या तरुणाचा शोध घेऊन त्याचे लसीकरण केले जाईल असा दावाही पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेला १२ दिवस उलटूनही पालिकेला तरुणाचा पत्ता लागलेला नाही. पालिकेला त्याचा शोध लागला नाही की शोध घेण्याचा प्रयत्न झाला नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. नाव नोंदणीवेळी त्या व्यक्तीची महत्वाची कागदपत्रे तपासली गेली की नाही, त्याच्या आधारकार्डचा क्रमांक प्रशासनाकडे आहे की नाही? असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले जात आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिका प्रशासन किती जागृत आहे हेच यावरून स्पष्ट होते. त्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही, तसेच त्याला संदेश पाठवूनही त्याला त्याने प्रतिसाद दिला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.