सँड हर्स्ट रोड स्थानक प्रवेशद्वारावर मराठीला डावलले!
मनसेचा आक्रमक पवित्रा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
मुंबादेवी, ता. ३ (बातमीदार) : मध्य रेल्वे मार्गावरील सँड हर्स्ट रोड स्थानकाच्या प्रवेशद्वार कमानीवर मराठी भाषेला स्थान दिले नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने याविरोधात आंदोलनाचा इशारा देताच हे नामफलक झाकण्यात आले. यासंदर्भात मनसेचे मुंबादेवी विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी पोलिस, पालिका आणि रेल्वे प्रशासनाला पत्र देत मराठी भाषेचा सन्मान राखा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सँड हर्स्ट रोड स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्यात आली असून, त्यात केवळ हिंदी, ऊर्दू आणि इंग्रजी भाषेतच स्थानकाचे नाव लिहिले आहे. यासंदर्भात मनसे विभागाध्यक्ष केशव मुळे म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तरीही मराठी भाषेला सन्मान मिळत नसेल तर मग मराठी भाषेला सन्मान देणार कोण असा प्रश्न केला. प्रवेशद्वारावरील नामफलकात हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दू भाषेला स्थान देण्यात आले असून, फक्त मराठीचे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे आमचा मराठीसाठी आग्रह असून, याच अट्टहासापोटी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत मराठी भाषेत नाव दिले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराच मुळे यांनी दिला आहे. या वेळी विनोद अरगिले, राजन दळवी, प्रशांत गांधी, सतीश लाड, शशिकांत ससाणे, प्रशांत ताकवले उपस्थित होते.
आम्ही मराठी भाषेचा सन्मान करतो. संबंधित नामफलक तयार करताना मराठीत लिहिणे चुकीने राहून गेले. आम्ही झालेली चूक दुरुस्त करून नवीन फलक तयार करून नंतरच प्रवेशद्वाराचे उद्घाटन करणार आहोत.
- अमीन पटेल, आमदार, मुंबादेवी