लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला अटक
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम असणाऱ्या आणि त्यातून ही मुलगी गरोदर राहिल्यावर फरारी झालेल्या आरोपीला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पीडित मुलीचा मामेभाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये आरोपी आणि पीडिता राहते. ही मुलगी १७ वर्षांची असून, याच भागातील नालंदा नगर परिसरात आरोपी राहतो. आरोपी हा पीडित मुलीच्या चुलत मामाचा मुलगा आहे. या मुलीचे आणि आरोपीचे एकमेकांवर प्रेम होते; परंतु मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. ही बाब घरी माहीत झाली तर कुटुंबीय रागावतील म्हणून तिने यू-ट्युबवर गर्भपाताच्या औषधांची माहिती घेतली. त्यानंतर एका मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या आणून २० डिसेंबरला त्यांचे सेवन केले.
पाच दिवसांनी या मुलीला जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने चक्कर येत होती. मात्र ही बाब मुलीने कोणालाही सांगितली नाही. ३० डिसेंबरला जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊन चक्कर आल्याने तिच्या भावाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याने तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ३१ डिसेंबरला दाखल केले. त्यावेळी मुलीने डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पंतनगर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर शनिवारी (ता. १) महिला पोलिस अधिकारी पौर्णिमा हांडे यांनी मुलीचा राजावाडी रुग्णालयात जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.