तरुणीवर मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार
अंबरनाथमधील घटना; तीन आरोपींना अटक
अंबरनाथ, ता. ३ (बातमीदार) : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबरनाथ येथे तरुणांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली असताना, त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात तिघा मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली. या घटनेनंतर अंबरनाथ हदरले आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक भागातील जीआयपी धरण परिसरात रविवारी (ता. २) हा प्रकार घडला. या धरण परिसरात तरुणी आणि तिचे तिघे मित्र फिरण्यासाठी गेले होते. यावेळी या तिन्ही मित्रांनी या तरुणींवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तरुणीने अंबरनाथ पूर्वतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून तक्रारदार तरुणीचे ते मित्र आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.