मुंबईतील भूमिगत पातमुखे
पालिका सुरक्षित करणार
जाळ्या बसवण्यासाठी मोजणार २४ लाख
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईने समुद्रमार्गाने झालेल्या हल्ल्याच्या जखमा सोसल्या आहेत. तब्बल १२ वर्षांनी अतिरेक्यांना रोखता यावे म्हणून मुंबईतील भूमिगत पातमुखे आता सुरक्षित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पातमुखांवर जाळ्या बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी २४ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गाने आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. तब्बल ७२ तास त्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. त्यानंतर सागरी सुरक्षेबाबत राज्य आणि केंद्र सरकारने अनेक उपाययोजना आखल्या. सागरी पोलिस ठाण्यापासून आवश्यक यंत्रणाही पोलिसांना पुरवण्यात आल्या. मात्र, त्यातून मुंबईतील पातमुखे सुटली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पातमुखांना संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबईत १८६ पातमुखे आहेत. त्यातील संभाव्य पातमुखांवर प्राधान्याने जाळ्या बसवण्यात येणार आहेत. पोलिस विभागांकडून आवश्यक ठिकाणांची माहिती पालिकेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २३ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.
मुंबईतील पावसाचे पाणी नैसर्गिक नाले आणि ओढ्यातून खाडी वा समुद्रात वाहून जाते. ज्या ठिकाणी नाले आणि ओढे समुद्राला मिळतात त्या ठिकाणाला पातमुखे (आऊटफॉल) असे म्हटले जाते.
-----
१२ वर्षांनी किनारी चौकीचा प्रस्ताव
२६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईतील सागरी किनाऱ्यांवर पोलिस चौक्या उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील मढ बेटावर चौकी उभारण्यासाठी जागेच्या वापरात बदल करण्याचा प्रस्ताव तब्बल १२ वर्षांनी २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात महापालिकेकडे आला होता. एक हजार आठ चौरस मीटरचा भूखंड पालिकेने हस्तांतरित केला होता.