`यिन`च्या निवडणुकीत मुलींची सरशी
जिल्हा अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची प्रक्रिया पूर्ण
मुंबई, ता. ३ : `सकाळ माध्यम समूहा‘च्या `यिन` उपक्रमातर्फे विविध महाविद्यालयांत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी जनसंपर्क, वक्तृत्व या माध्यमातून आपापल्या महाविद्यालयांत भरघोस मतांनी निवडून येत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद पटकावले. नुकतीच या सर्वांची जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूकही पार पडली. या निवडणुकीत मुली सरस ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
बेलापूरमधील `सकाळ भवन` येथे रविवारी (ता. २) प्रथम लेखी परीक्षा, मुलाखत आणि या दोन्ही प्रक्रियेला सामोरे जाऊन अंतिम दोनमध्ये येण्याचा मान काही उमेदवारांनी पटकावला. यामध्ये त्या-त्या जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांतील प्रतिनिधींनी या दोन उमेदवारांना आवाजी पद्धतीने मतदान केले. यामध्ये मुंबई शहर जिल्हाध्यक्षपदी रुईया महाविद्यालयाची समृद्धी ठाकरे, उपाध्यक्षपदी गुरुनानक खालसा महाविद्यालयाची लक्ष्मी गोसाई यांनी बाजी मारली. तसेच मुंबई उपनगराचे जिल्हाध्यक्ष पद पाटकर वर्दे महाविद्यालयाच्या संजय गिरी व उपाध्यक्ष पद घनश्यामदास सराफ महाविद्यालयाच्या दिशा कुमावत यांनी पटकावले.
या संपूर्ण प्रक्रियेचे परीक्षण नेरूळ येथील एस. आय. एस. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे डॉ. रामकिशन भिसे, घाटकोपर येथील श्रीमती पी. एन. दोषी वूमेन्स
महाविद्यालयाचे डॉ. सचिन भुंबे, मुंबईतील अमेटी युनिव्हर्सिटीचे डॉ. कृष्णा आगे, पनवेल येथील चांगा काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राध्यापक आकाश पाटील आदींनी केले.
`यिन`च्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी जिल्ह्यातून निवडून येणे फार महत्त्वाचे असते. सामना फार अटीतटीचा होता. पण मी या सर्व प्रक्रियेला सामोरे गेले व बहुमत घेऊन मुंबई शहराचे जिल्हाध्यक्ष होण्याचा मान मिळाला, याचा मला अभिमान वाटतो.
- समृद्धी ठाकरे, जिल्हाध्यक्ष, रुईया महाविद्यालय.
मी ठामपणे माझे युवकांच्या प्रश्नांबाबतचे मत विविध महाविद्यालयातून निवडून आलेल्या प्रतिनिधींसमोर मांडू शकले. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केले, त्या सर्वांचे मनापासून आभार.
- लक्ष्मी गोसाई, जिल्हा उपाध्यक्ष, गुरू नानक खालसा महाविद्यालय.
मी दररोज सकाळी घरोघरी वर्तमान पत्र टाकून माझे महाविद्यालयीन शिक्षणही घेतो. माझ्या सहकाऱ्यांनी मला निवडून दिलेच, पण मी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी सर्वांनी मला सहकार्य केले.
- संजय गिरी, जिल्हाध्यक्ष, पाटकर वर्दे महाविद्यालय.
`यिन`ने आम्हाला जिल्हा उपाध्यक्ष बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करता येणार आहे. माझे कुटुंबीय माझ्या या यशाबद्दल आनंदी आहेत.
- दिशा कुमावत, जिल्हा उपाध्यक्ष, घनश्यामदास सराफ महाविद्यालय.
समृद्धी ठाकरे २. लक्ष्मी गोसाई ३. संजय गिरी ४ .दिशा कुमावत