सेन्सेक्स ५९ हजारांवर
९२९ अंशांची वाढ
मुंबई, ता. ३ : देशांतर्गत आर्थिक स्थिती सुधारत असल्याने गुंतवणूकदारांनी आज शेअर्सची तुफान खरेदी केल्याने भारतीय शेअर बाजार निर्देशांक दीड टक्क्यांहून जास्त वाढले. सेन्सेक्स ९२९.४० अंश; तर निफ्टी २७१.६५ अंशांनी वाढला. या खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा ५९ हजारांचा टप्पा ओलांडला.
आज दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,१८३.२२ अंशांवर; तर निफ्टी १७,६२५.७० अंशांवर स्थिरावला. निफ्टीच्या प्रमुख ५० शेअरपैकी फक्त सहा शेअरचे भाव पडले; तर सेन्सेक्समधील ३० मुख्य शेअरपैकी फक्त पाच शेअरचे भाव घसरले. आज बँका आणि वित्तसंस्थांचे शेअर वाढले; तर औषधनिर्मिती क्षेत्राच्या शेअरचे भाव पडले. डिसेंबरमधील जीएसटीचे विक्रमी संकलन, मोटारविक्रीची समाधानकारक आकडेवारी, उत्पादन क्षेत्रात झालेली वाढ आणि देशात अद्यापतरी फार मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन झाले नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवसात जोरदार तेजी अनुभवायला मिळाली.
आज डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर ५५ रुपयांनी घसरून ४,८५३ रुपयांवर स्थिरावले. नेस्लेचे शेअर ३७ रुपयांनी घसरून १९, ६७१ रुपयांवर आले. टेक महिंद्र, टायटन व महिंद्र आणि महिंद्र हे शेअर किरकोळ घसरले. दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह ५८३ रुपयांनी वाढून १६,९७३ रुपयांवर; तर बजाज फायनान्स २४५ रुपयांनी वाढून ७,२२२ रुपयांवर गेला. आयसीआयसीआय बँक (बंद भाव ७६४ रु.), टाटा स्टील (१,१४३ रु.), इंडसइंड बँक (९१२), एचडीएफसी बँक (१,५१९), लार्सन अँड टुब्रो (१,९२२), टीसीएस (३,८१८), एचडीएफसी (२,६३५), रिलायन्स इंडस्ट्रीज (२,४०४), ॲक्सिस बँक, स्टेट बँक यांचे भाव वाढले.