मुंबई जिल्हा बँकेवर दरेकर यांचेच वर्चस्व

मुंबई जिल्हा बँकेवर दरेकर यांचेच वर्चस्व
मुंबई जिल्हा बँकेवर दरेकर यांचेच वर्चस्व २१ जागांवर सहकार पॅनेलच्याच उमेदवारांची निवड सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ ः मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उरलेल्या चार जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीतही सहकार पॅनेलचेच उमेदवार निवडून आले. आता संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागांवर सहकार पॅनेलचेच उमेदवार निवडून आल्याने विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व दिसून आले आहे. या निवडणुकांमध्ये यापूर्वीच दरेकर, प्रसाद लाड, सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार आदी प्रमुख उमेदवार बिनविरोध निवडून आले. दरेकर हे नागरी बँक आणि मजूर पतसंस्था या दोन गटांत बिनविरोध निवडून आल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. आज महिला सहकारी संस्था मतदारसंघातून जयश्री पांचाळ, मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदारसंघातून विठ्ठलराव भोसले, प्राथमिक ग्राहक संस्था मतदारसंघातून पुरुषोत्तम दळवी व एनटी (आरक्षित) मतदारसंघातून अनिल गजरे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. बँकेच्या कारभारावर टीका झाली, मात्र मुंबईकरांनी तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी बँकेवर विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ ठरवून बँकेच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळकटी देऊ, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी यानिमित्ताने ‘सकाळ’कडे व्यक्त केली. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर नव्याने निवडणुका घ्यायच्या तर पैशांचा चुराडा होणार. तसेच कोरोनाचे निर्बंध असल्याने या निवडणुका टाळाव्यात व सहमतीने उमेदवार ठरवून ते निवडणूक न घेता एकमताने निवडून आणावेत ही कल्पना दरेकर यांनी सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांना पटवून दिली. त्यानुसार सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. हे उमेदवार सहमतीने निवडून येतील याची काळजी घेण्यात आली. त्यानुसार अर्ज मागे घेण्याच्या तारखेला १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर उरलेल्या चार जागांसाठी काल मतदान झाले व आज हे निकाल जाहीर करण्यात आले. मजूर म्हणून अपात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरवले आहे. सहकार विभागाने ही कारवाई करण्याचे अधिकार उपनिबंधक कार्यालयाला दिले आहेत; मात्र नागरी सहकारी संस्थांच्या गटातूनही दरेकर यांची निवड झाली आहे. त्या गटातील निवडणूक वैध असल्याने ते अध्यक्षपदावर राहू शकतील, असे काही तज्ज्ञांचे मत असल्याचे बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com