उल्हासनगरात २०० खाटांचे
कोविड रुग्णालय पूर्णत्वाकडे
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः उल्हासनगर महापालिकेच्या २०० खाटांचे कोविड रुग्णालय पूर्णत्वाच्या मार्गावर असून, प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण सज्ज असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. म्हारळ गावासमोरील रिजेन्सी निर्माण या कंपनीने चार मजल्याची इमारत विकसित करून ती पालिकेला हस्तांतरित केली आहे. या इमारतीत हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. सोमवारी (ता. ३) सायंकाळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या रुग्णालयाची पाहणी केली आहे.
इमारतीचे क्षेत्र १२ हजार चौरस फुटांचे असून, तिच्या तळमजल्यावर औषधांचे दुकान, ऑपरेशन थिएटर, पहिल्या मजल्यावर ३० खाटांचे आयसीयू सेंटर, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर १७० खाटांचे सर्वसाधारण युनिट विकसित करण्यात आले आहे. तसेच सहा हजार किलोलिटरचा ऑक्सिजन टॅंक, २०० जम्बो सिलिंडर हवेतून ऑक्सिजन घेऊन भरण्यासाठी प्लांट उभारण्यात आला आहे. या इमारतीत ४० किलोव्हॅट क्षमतेचा सोलर प्लांट बसविण्यात आला आहे. तसेच अग्निशमन यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे.
कोरोना संपल्यावर हे रुग्णालय मल्टीस्पेशालिटी म्हणून विकसित करण्यात येईल. या रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एनआयसीयू या सेवांसह नामांकित डॉक्टरांची नेमणूक करून शहरवासीयांना सेवा देण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. महापौर लीलाबाई आशान, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर, कलवंतसिंग सोहता, स्वप्नील बागुल, उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी दिलीप पगारे, मुख्य शहर अभियंता महेश सितलानी आदी या वेळी उपस्थित होते.