२४ लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत
वांद्रे टर्मिनसवर आरोपी ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवर एक व्यक्ती मोठी बॅग घेऊन उभी होती; मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कर्तव्यावरील आरपीएफ कॉन्स्टेबल सुरेशकुमार गुजर यांनी त्याची चौकशी केली. मात्र, त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता २३.६० लाख रुपयांचे चोरी केलेले दागिने, मौल्यवान वस्तू त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. झिक्रान कुरेशी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
वांद्रे टर्मिनसवर शनिवारी (ता. १) पहाटे ४.३० वाजता आरपीएफ कॉन्स्टेबल गुजर कर्तव्यावर होते. त्या वेळी झिक्रानच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता, कुटुंबीयांना घेण्यासाठी आलो आहे, असे कारण त्या सांगितले. त्याच्याकडे फलाट तिकिटाची मागणी केली असता ते नव्हते. त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जवानाने त्याला पकडले. आरपीएफ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता, १ जानेवारीला वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी भागात घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर आरपीएफ विभागाने तत्काळ रेल्वे पोलिस आणि निर्मलनगर पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला रेल्वे पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
------------
जप्त केलेला ऐवज
चोरी करण्यात आलेल्या सामग्रीत २२ लाख ४८ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या नाणी, १७ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि चांदीची नाणी, एका पिगी बँकसह २० हजार ७४८ रुपये रोख रक्कम, ७३ हजार रुपये किमतीची १४ घड्याळे अशा सर्व मौल्यवान वस्तू बॅगेत मिळाल्या. असा एकूण २३ लाख ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.