मशीद बंदर येथे लसीकरण केंद्र हवे!
१० लाखांच्या निधीअभावी समस्या
मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) ः मशीद बंदर येथील जनाबाई रोकडे शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी स्थानिकांनी केली असून अवघ्या १० लाखांच्या निधीअभावी लसीकरण केंद्र सुरू होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात नगरसेविका आफरीन शेख, उमर लकडावाला यांनी पालिकेला पत्र दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाअंतर्गत येणाऱ्या उमरखाडी येथील नजम बाग येथे लसीकरण केंद्र सुरू आहे. तेथे आजपर्यंत जवळपास ६५ ते ७० लाखांचा खर्च झालेला आहे. दुसरे केंद्र हलाई जमात व तिसरे कच्छी मेमन येथे तात्पुरत्या स्वरूपात असून तेच येथे हलवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बी विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गायकवाड म्हणाले, की सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे असून आमचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांचे याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू असून यश नक्कीच मिळेल. ‘मुंबई महापालिकेच्या शाळेत एका बाजूला बांबू आणि कापडी बंदिस्त मंडप घालून लसीकरण केंद्र सुरू केल्यास पालिकेच्या लाखो रुपयांची बचत होऊन लसीकरणही वेगात होईल,’ असे मनसेचे रोहन चाळके यांनी म्हटले आहे.
बी वॉर्डचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी सांगितले, की लसीकरण केंद्र उभारण्यास १० लाखांची आवश्यकता आहे हे खरे आहे. एखादी एनजीओ याबाबत मदत करण्यास पुढे यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
...
५०० जणांचे लसीकरण अपेक्षित
जनाबाई रोकडे पालिका शाळा ही मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ असून येथे रोज किमान ५०० जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. कारण येथे वाहनचालक, मदतनीस, हमाल, माथाडी, मापारी कामगार तसेच हातगाडीवाले, कष्टकरी मजूर यांची मोठी संख्या असून स्थानिक नागरिकांची संख्याही मोठी आहे.