दुकानदारांना दंडआकारणीचा निर्णय रद्द करा
मुंबई भाजप व्यापारी सेलची पालिकेकडे मागणी
मुंबई, ता. ४ ः दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क न लावल्यास दुकानदाराला मोठा दंड आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई भाजप व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने नुतीच अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन ही मागणी केली.
दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याला फक्त ५०० रुपये दंड आकारला जाईल, पण संबंधित दुकान अथवा आस्थापनेला १० हजार रुपयांचा दंड करण्याचा सरकारचा आदेश आहे. तो आदेश राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना १० हजारांचा दंड म्हणजे लूटच असल्याची टीकाही लोढा यांनी या वेळी केली. हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. या वेळी मुंबई भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, जयेश जोशी, अल्पेश शहा, प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.