मिरा-भाईंदरमध्ये ‘मराठा भवन’ होणार
सरकारकडून एक कोटींचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ ः मिरा-भाईंदरमध्ये मराठा भवन उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील मौजे महाजनवाडीतील २२३७.७० चौरस मीटरचा सुविधा भूखंड निश्चित करण्यात आला आहे. ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या नावाने हे मराठा भवन बांधण्यात येणार असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. सरकारने या प्रकल्पाला मंजुरी देत सहा कोटींचा निधीही मंजूर केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी एक कोटीचा निधी पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहरात ‘मराठा भवन’ व्हावे अशी मराठा समाजाची मागणी होती. मराठा समाजाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आमदार सरनाईक यांची वर्षभरापूर्वी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले होते व हे काम मंजूर करण्याची विनंती केली होती, परंतु पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे या भवनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी मिळावा, यासाठी आमदार सरनाईक हे सरकारकडे प्रयत्नशील होते. पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. त्यात मिरा-भाईंदरच्या या मराठा भवनासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
समाजाला फायदा
मराठा भवनाच्या बांधकामासाठी जवळपास सहा कोटी इतका खर्च आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील एक कोटी निधी मंजूर झाला आहे. उर्वरित पाच कोटी इतका निधी राज्य सरकारकडून पुढील आर्थिक वर्षात दिला जाणार आहे. मिरा-भाईंदर शहरात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मिरा-भाईंदर शहरातील मराठा समाज बांधवांची मागणी आमदार सरनाईक यांनी पूर्ण केली आहे. हे मराठा भवन झाल्यास नक्कीच समाजाला त्याचा फायदा होईल, असे मराठा समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गरजू मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासिका
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गरीब विद्यार्थी व एकूणच गरजू समाज घटकासाठी आणखी एक योजना मिरा-भाईंदरमध्ये राबवली जाणार आहे. गरजू मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासिका, कॉन्फरन्स रूम, बाहेरगावाहून शहरात आलेले मराठा नेते, साहित्यिक व इतर यांना राहण्याची सुविधा असलेली ‘बहुउद्देशीय इमारत’ही लवकरच राज्य सरकारकडून मंजूर केली जाणार आहे. मिरा-भाईंदरमध्ये कोर्ट इमारतीच्या बाजूला महसूल खात्याची २७०० मीटर जागा असून, तेथे राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. हा प्रस्तावही राज्य सरकारच्या विचारधीन असून, त्यासाठी आमदार सरनाईक पाठपुरावा करीत आहेत.