दहावीचे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत

दहावीचे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत

दहावी-बारावीचे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत वाढता कोरोना, ऑनलाईन शिक्षणाच्या परिणामांची चिंता ठाणे, ता. ४ (बातमीदार) : नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्वत्रच चिंतेचे वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन सोमवारी (ता. ३) मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा-महाविद्यालये बंद करून वर्ग पुन्हा ऑनलाईन सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र या निर्णयानंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत अडकले असून, त्यांना एकीकडे वाढत्या कोरोनात शाळेत जाण्याची; तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासावर झालेल्या परिणामाचीही चिंता लागून राहिली आहे. कोरोना साथीमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील सर्व वर्ग हे बराच काळ ऑनलाईन माध्यमातून सुरू होते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले असले, तरी त्यात प्रत्यक्ष संवादाचा अभाव असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. हे लक्षात घेऊन कोरोना संसर्ग कमी होताच जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये आठवी ते बारावीचे; तर डिसेंबर महिन्यात पहिली ते सातवीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले; मात्र डिसेंबरअखेरपासून कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करण्याची वेळ ओढवली आहे; मात्र असे असतानाही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रत्यक्ष सुरू ठेवल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रतिक्रिया संपूर्ण वर्ष घरात बसवले आणि आता कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आम्हाला शाळेत जाण्यास सांगितले जात आहे. आमच्या जीवाची सरकारला काळजी नाही का? ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासावर काहीसा परिणाम झाला हे खरे असले, तरी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रत्यक्ष सुरू ठेवणे या निर्णयामुळे दहावीच्या वर्षाला आमच्या जीवापेक्षा जास्त महत्त्व दिल्यासारखे वाटते. लेखी परीक्षेबाबत मनात थोडी धाकधूक असली, तरी यंदा प्रत्यक्ष परीक्षा व्हाव्यात. - दुर्वा आचार्य, मंथन मोरे, विद्यार्थी दहावीच्या शाळा सुरू ठेवल्याने संसर्गाची भीतीदेखील आहे; मात्र प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवणे गरजेचे असून, यामुळे मुख्य परीक्षेसाठी नियमित सराव होत आहे. परीक्षेला काहीच महिने राहिले आहेत. तेव्हा शाळा प्रत्यक्ष सरू राहिल्या आणि सराव पक्का झाला तर मार्च महिन्यात होणाऱ्या मुख्य लेखी परीक्षांची भीती काहीशी कमी होईल. - गौरव निठुरी, प्राची पडवळ, विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षा अगदी काही महिन्यांवर आल्या असताना प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांकडून मुख्य परीक्षांसाठी करून घेतील जाणारी तयारी उपयुक्त ठरेल; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शाळांनी स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य आदींकडे काटेकोर लक्ष देऊन शाळेचे व्यवस्थापन करावे. - संजना मोरे, पालक मागील दोन वर्षे परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे काही बाबतीत नुकसान झाले; मात्र यंदा प्रत्यक्ष शाळा आणि परीक्षा होणार हा निर्णय योग्य आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. कोरोनाच्या सर्व आवश्यक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत अथवा परीक्षांसाठी पाठवण्यास काही हरकत नाही. - पूनम पवार, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com