डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये दुप्पट वाढ
मुंबईत पावसाळी आजारांचा विळखा कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ओमिक्राॅनपाठोपाठ मुंबईत साथीच्या आजारांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. मुंबईत मागील दहा दिवसांत मलेरिया, डेंग्यूसह गॅस्ट्रोच्या रुग्णांत दुपटीने वाढ झाली आहे. २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान मलेरियाचे २८८, गॅस्ट्रोचे ४३३; तर डेंग्यूचे ४० नवीन रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे कोरोनासह ओमिक्राॅन विरोधातील लढ्यात वाढत्या साथीच्या आजारांनी पालिकेची चिंता वाढवली आहे.
दरम्यान, मलेरिया, डेंग्यू असे साथीचे आजार वाढत असले तरी ''एच १ एन १''चे रुग्ण कमी आहेत. गेल्या १० दिवसांत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपिका राणा यांनी सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांमध्ये आता वाढ होत असल्याचे सांगितले आहे. या आजारांनी ग्रस्त रोज ३५० हून अधिक रुग्ण पालिकेच्या कान-नाक-घसा या रुग्णालयातील ओपीडीत येत आहे. तसेच, सर्दीमुळे कानाचे विकारही वाढल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या संपूर्ण वर्षात साथीच्या आजारांमुळे सात जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. यंदादेखील साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असले तरी मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.
दहा दिवसांत आढळलेले रुग्ण
मलेरिया - २८८
लेप्टोस्पायरोसिस- ४
गॅस्ट्रो - ४३३
डेंग्यू - ४९
कावीळ - ३७
चिकनगुनिया - १२
लेप्टो - ४
एच१ एन१ - ०