जुन्या कोपरी उड्डणपुलाला नवा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या कोपरी उड्डणपुलाला नवा साज
जुन्या कोपरी उड्डणपुलाला नवा साज

जुन्या कोपरी उड्डणपुलाला नवा साज

sakal_logo
By
जुन्या कोपरी पुलाला नवा साज दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला सुरुवात ठाण्यातील वाहतूक मार्गात बदल सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ४ ः पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाणे आणि मुंबईकरांच्या बहुप्रतीक्षित असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला नवीन मार्गिका बनवल्यानंतर आता हे काम हाती घेण्यात आले आहे. जुना उड्डाणपूल पाडून दुसऱ्या टप्प्यातील मार्गिका बनवण्यात येणार आहेत. पुढील नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे जुन्या कोपरी पुलाला नवा साज मिळणार असून भविष्यात ठाणे ते मुंबईचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. दरम्यान, या कामासाठी वाहतूक विभागाने कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद केला असून, वाहनांच्या मार्गात बदल केले आहेत. ठाणे आणि मुंबई शहरातील वाहतुकीसाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जातो. या उड्डाणपुलावरून सतत दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची वर्दळ असते. या पुलाला जोडणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चारपदरी रस्ता आहे. त्यामुळे कोपरी पूल वाहतुकीसाठी अरुंद ठरून सतत वाहतूककोंडी होत होती. यावर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यामध्ये जुन्या उड्डाण पुलाशेजारीच दोन्ही बाजूला प्रत्येकी दोनपदरी रस्त्यांचा नवा पूल उभारण्यात आल्यानंतर आता नवीन वर्षात जुन्या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेण्यात आले आहे. पुलासाठी वापरण्यात येणारे भक्कम गर्डर देशात पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. जुने गर्डर काढून हे नवीन गर्डर उभारण्यात येणार आहे. दोन्ही मार्गिकांचे काम मंगळवारी, ४ जानेवारीपासून एकाच वेळी हाती घेण्यात आल्यामुळे हा पूल काम फत्ते होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, पण हे काम कोणत्याही परिस्थितीत नऊ महिन्यांच्या आत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे वाहनचालकांची थोडी गैरसोय होणार आहे, पण त्यामुळे शहरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागानेही खबरदारी घेतली आहे. जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून त्याऐवजी नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावर वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्गही देण्यात आले आहेत. ...असा होणार वाहतुकीत बदल एक दिशा मार्ग- सकाळी ७ ते ११ या वेळेत तीन हात नाका- गुरुद्वारा- भास्कर कॉलनी सेवा रस्ता ते मुंबई पर्यायी मार्ग- मुंबई-नाशिक मार्गे भास्कर कॉलनी-टेलिफोन नाका येथून इच्छित स्थळ प्रवेश बंद- सकाळी ७ ते ११ कोपरी उड्डाणपूल ते गुरुद्वारा-तीन हात नाका सेवा मार्ग एक दिशा मार्ग- सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत भास्कर कॉलनी- गुरुद्वारा- तीन हात नाका सेवा मार्ग मुंबई ते नाशिक पर्यायी मार्ग- ठाणे-मुंबईमार्गे मल्हार टॉकीज- टेलिफोन नाका- कोपरी रेल्वे पूल प्रवेश बंद- सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत गुरुद्वारा- कोपरी पूल- तीन हात नाका सेवा मार्ग कोंडी टाळण्याचे प्रयत्न जुन्या कोपरी पुलाचे काम मंगळवारी ४ जानेवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल बंद होणार असून त्यामुळे कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना नव्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक करण्यास बंदी असेल. येथील वाहने सेवा रस्ता, बारा बंगलामार्गे मुंबईच्या दिशेने जातील; तर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने आनंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन बाराबंगला मार्गे तीन हात नाक्याच्या दिशेने येतील; तर चारचाकी तसेच इतर वाहनांना नव्या कोपरी पुलावर प्रवेश असेल, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top