अनिल देशमुख यांचा
जामिनासाठी अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मागील दोन महिन्यांपासून देशमुख कारागृहात आहेत.
देशमुख सध्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्याविरोधात खंडणीवसुलीचे आरोप केले होते. याबाबत सीबीआय आणि ईडीने तपास सुरू केला आहे; तर राज्य सरकारनेदेखील निवृत्त न्या. के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नियुक्त केला आहे. ईडीने नुकतेच देशमुख यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुख यांनी खंडणीमार्फत सुमारे चार कोटी रुपये स्वतःच्या संस्थांना मिळवून दिले, असा आरोप ईडीने केला आहे. मागील नोव्हेंबरपासून देशमुख कोठडीत आहेत. न्यायालयानेही अद्याप आरोपपत्राची दखल घेतलेली नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १६७ तरतुदीनुसार आरोपीच्या अटकेपासून ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झालेले नाही किंवा त्या आरोपपत्राची दखल घेतली गेली नाही, तर आरोपी आपसूकच (डिफॉल्ट) जामिनासाठी पात्र ठरतो. त्यामुळे देशमुखांना डिफॉल्ट जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे. बुधवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.