भिवंडीत इमारतीची गॅलरी कोसळून पादचारी ठार
भिवंडी, ता. ४ (बातमीदार)ः भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार रोड परिसरातील एका जुनाट इमारतीची रस्त्याच्या बाजूने असलेली गॅलरी कोसळून अपघात झाला. यात एका भिक्षेकरी पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत निजामपूर पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.
भिवंडी तालुक्यातील खाडीपार येथे दोनमजली इमारत असून त्याच्या तळमजल्यावर सागर किनारा हॉटेल आहे. त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉटेलमधील कामगार राहतात. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा रस्त्याच्या बाजूने असलेला सज्जा अचानक कोसळला. त्याच सुमारास आदिवासी पाड्यावर राहत असलेला शीडा दादू पढेर (वय ७२) हा भिक्षेकरी त्या ठिकाणाहून जात होता. तेव्हा त्याच्या डोक्यावर गॅलरीचा ढिगारा पडला. त्यामुळे वृद्ध भिक्षेकऱ्याच्या शरीरातून रक्तस्राव सुरू झाला. त्याला जखमी अवस्थेत तातडीने भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले. या दुर्घटनेसंदर्भात इमारत मालक शादाब हनी यांच्याविरोधात पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. मयत भिक्षेकरी हा मूळ जव्हार येथील रहिवासी होता. भिक्षा मागून चरितार्थ चालवण्यासाठी येथील पाड्यावर तो राहत असे.