कूपर रुग्णालयातील
परिचारिकांचे आंदोलन
रिक्त जागा भरण्यासाठी ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत कूपर रुग्णालयातील नोबेल नर्सिंग युनियनच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ४) कूपर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कूपर रुग्णालयात १८३ नर्सिंग स्टाफ आहे. आयसीयूतील १० रुग्णांमागे एक परिचारिका आहे. जनरल वॉर्डमध्ये सहा रुग्णांमागे एक परिचारिका काम करते. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. एका परिचारिकेस दोन विंगमध्ये काम करण्याचा दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे परिचाकांना योग्य रीतीने कामाची जबाबदारी पार पडणे शक्य होत नसून त्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोना काळातील विलगीकरण रजा मंजूर करावी, दीर्घ काळापासून गैरहजर असणाऱ्या परिचारिकांवर कारवाई करावी, रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत नव्याने सुरू करण्यात आलेले विभाग बंद ठेवावेत, रिक्त असलेली अधिसेविकेची जागा भरावी, शिकाऊ डॉक्टर कुठल्याही सूचनेचे पालन करत नाहीत याची रुग्णालय प्रशासनाने दखल घ्यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांनी डॉ. शैलेश मोहिते यांना पत्र दिले होते; मात्र मागण्या पूर्ण करण्याबाबत रुग्णालय प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करीत आज रुग्णालय आवारात ठिय्या आंदोलन केल्याचे नोबेल नर्सिंग युनियनच्या प्रतिनिधींनी सांगितले.
तोडग्यासाठी समिती
परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असून परिचारिकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या सहकार्याने समिती स्थापन करण्यात येईल, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.