बीडीडी चाळींचा पुनर्विकास जलद गतीने पूर्ण करणार
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन; विक्रीयोग्य टॉवरचे प्रथम बांधकाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सुमारे शंभर वर्षे जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाद्वारे येथील रहिवाशांना सर्व सुविधांयुक्त मोठे घर देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न आज नायगाव येथील ‘बीडीडी चाळ क्रमांक ५ ब’चे पाडकाम सुरू करून प्रत्यक्षात साकारत आहे. ही चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी लवकरच विक्रीयोग्य सदनिका बांधण्यात येईल. पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ‘५ ब’ मंगळवारी (ता. ४) निष्कासित करून पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी आव्हाड बोलत होते. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ‘ब’मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत असून उर्वरित प्लॉट ‘अ’मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे. प्लॉट ‘ब’मधील २३ चाळींपैकी चाळ क्रमांक ५ बी, ८ बी व २२ बी मधील १७५ गाळे महापालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयास सेवानिवासस्थान म्हणून देण्यात आले होते. या सेवा निवासस्थान गाळ्यांमधील रहिवाशांना नायगाव येथील बॉम्बे डाईंग या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित करून चाळ रिक्त करण्यात आली आहे. निष्कासित रिक्त इमारती पाडून त्या ठिकाणी विक्रीयोग्य सदनिका बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
काही स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे प्लॉट ‘ब’मधील सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नाही. या रहिवाशांच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार शासनातर्फे केला जाईल. रहिवाशांचे प्रकल्पाच्या बाजूने सकारात्मक मतपरिवर्तन झाले असून हा प्रकल्प मार्गी लागण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. प्लॉट ‘अ’मधील चाळ क्रमांक १ अ, २ अ, १४ अ, १८ अ, १९ अ या पाच चाळींतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ३२५ पात्र लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नायगाव बीडीडी चाळीमध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात असून त्यामध्ये एकूण ३ हजार ३४४ रहिवासी वास्तव्यास आहेत. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये तीन बेसमेंट व २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. या वेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक आदी उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास बांधकामाला विरोध
बीडीडी चाळीतील पोलिस, महापालिका कर्मचारी आणि रहिवाशांच्या विविध मागण्या सरकारने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. आमच्या मागण्यांवर गुरुवारी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीत रहिवाशांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पाच्या बांधकामास आमचा विरोध राहील, असा इशारा अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांचा एकत्रित संघ समितीचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी दिला आहे. आधी घराचा करारनामा करावा, १९९६च्या पुराव्याची अट रद्द करावी, अशा मागण्या येथील रहिवाशांनी केल्या आहेत.
पोलिसांप्रमाणेच आम्हालाही घरे द्या!
बीडीडी चाळीत अनेक वर्षांपासून वास्तव्य करत असलेल्या पोलिस कुटुंबीयांना या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे; मात्र पालिका कर्मचाऱ्यांना अद्याप सामावून घेण्यात आलेले नाही. नायगाव येथील ‘५ ब’ इमारतीमध्ये माझे पणजोबा, आजोबा, वडील आणि आता मी वास्तव्य करत आहे. या चाळीत आमची चौथी पिढी वास्तव्य करत आहे. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच आम्हालाही या प्रकल्पात घर द्यावे, अशी मागणी येथील रहिवासी व पालिका कर्मचारी प्रणय घोलप यांनी केली आहे.
ना. म. जोशी मार्गावरील चाळींचा पुनर्विकास कधी?
नायगाव येथे प्रचंड विरोध असतानाही येथील चाळ रिकामी करून ती आज तोडण्यास सुरुवात झाली; पण ना. म. जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केला आहे. या चाळीचा पुनर्विकास वेगाने व्हावा, यासाठी रहिवाशांनी म्हाडाला घरे रिकामी करून दिली. सुमारे अडीच वर्षांपासून रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. त्यामुळे पुनर्विकासाला लवकर सुरुवात करावी, यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे नलगे म्हणाले.