हायमॅक्स दिव्याच्या प्रकाशाला भ्रष्टाचाराची काळी किनार
सखोल चौकशीची आमदार कथोरेंची मागणी
टिटवाळा, ता. ४ (बातमीदार)ः ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील गावागावांत लावलेल्या हायमॅक्स दिव्यात मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या ६ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आवाज उठवणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर व मुरबाड या तालुक्यांतील अनेक गावांतील ग्रामविकास व सेस निधी, दलित वस्ती निधी १४ व १५ व्या वित्त आयोगामार्फत चौकाचौकात रात्री लख्ख प्रकाशासाठी हायमॅक्सचे दिवे बसवले आहेत. या दिव्यांत अधिकारी व पदाधिकारी यांनी टक्केवारीद्वारे भरमसाट रक्कम हडप केली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील गावांत आठशेपेक्षा अधिक हायमॅक्स दिवे बसवले आहेत. कल्याण तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये १२९ हायमॅक्स दिवे बसवण्यात आले आहेत. हे दिवे बसवण्यासाठी महावितरण व बांधकाम विभागाची परवानगी घेतली गेली नाही.
काही गावांत तर पथदिव्यांचे अधिकृत वीज मीटर नाही, तरी हायमॅक्स बसवण्यात आले आहेत. केवळ टक्केवारीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता हे दिवे बसवले. त्याचे टेंडर जिल्हा परिषदेने काढले. यात खूप मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यातच हायमॅक्स दिव्यांसाठी वापरलेले साहित्य तकलादू आणि निकृष्ट दर्जाचे आहे. काही हायमॅक्स लावल्यानंतर लगेच बंद पडले आहेत, असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.