सावित्री माईने दिलेला शिक्षणाचा वसा आम्ही सोडणार नाही
समता विचार संस्थेतर्फए ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे, ता. ४ (बातमीदार) : स्त्रीने शिक्षण घेतल्याशिवाय तिला माणूस म्हणून सन्मानाने जगता येणार नाही हे ओळखून, स्त्री शिक्षणासाठी अपार हाल अपेष्टा सोसणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. शिक्षणाचा मिळालेला वसा सोडणार नाही, असा निर्धार वस्तीतील महिलांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात केला.
ठाणे शहरात समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सोमवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात विविध वस्तीत होणाऱ्या या व्याख्यानमालिकेतील पहिले पुष्प २ जानेवारी रोजी कळवा येथे गुंफण्यात आले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर जमलेल्या मुलामुलींना मार्गदर्शन केले. वंदना यांनी बुवाबाजी मध्ये केले जाणारे चमत्कार स्वतः करून दाखवले. त्यामागे दैवी शक्ति नसून वैज्ञानिक सिद्धांत आहेत हे सिद्ध केले. बुवाबाजी हे ढोंग असून त्याच्या आहारी जावू नये असे आवाहन केले.
३ जानेवारी रोजी ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकात व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. यात ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात वस्तीवस्तीमधील महिलांनी गाणी, कविता, ओवी यांचे सादरीकरण केले. यात मुलामुलींनी स्त्रियांचे कर्तृत्व दाखवणारी गाणी जोशपूर्णरित्या सादर केली. सेवालाल नगरातील ईशा आणि मानसी यांनी जोतिबाचे नमन सादर केले. सीमा श्रीवास्तव, ईशा आणि मानसी यांनी जोतिबांचा अखंड सादर केला. कशीश या मुलीने सावित्रीबाईंबद्दल माहिती सांगितली. रमाबाई आंबेडकर नगर येथील महिलांनी सावित्रीबाईंसारखा वेश परिधान करून त्यांचे गुणगान करणारी अत्यंत मधुर अशी ओवी सादर केली. तसेच नीरा जोगम यांनी सावित्रीबाईंची माहिती विशद केली. कळवा येथील सुनीता राठोड हिने सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून दिली.
आजच्या काळात सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नाही तर अनेक ठिकाणी त्यांच्या पुढे जाऊन कार्य करत आहेत. त्यामुळे मुलींनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि स्वतंत्र पणे विचार करायला शिकले पाहिजे असे संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया यांनी आवर्जून सांगितले. लतिका सु. मो. यांनी दुसऱ्या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान भूषवले. शिक्षणाचा वसा आपण पुढे नेला पाहिजे आणि कितीही प्रतिकूल आव्हाने समोर उभी राहिली तरी स्वत:वर विश्वास ठेवून त्याला तोंड दिले पाहिजे असे सांगून महिलांना सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.