क्रूझमधील ६६ प्रवासी
पालिकडून क्वारंटाईन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईहून गोव्याला गेलेल्या आणि पुन्हा मुंबईत संध्याकाळी सहा वाजता आलेल्या कार्डेलिया क्रूझमधील प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ६६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतर प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल उद्या (ता. ५) सकाळी आल्यावर निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांचे सात दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे.
पर्यटकांना घेऊन चार दिवसांपूर्वी कार्डेलिया क्रूझ गोव्याला गेली होती. गोव्यात गेल्यावर या क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील काही जण पॉझिटिव्ह आले. क्रूझमधील प्रवाशांना पाण्यातच क्वारंटाईन केले गेले होते. आज मंगळवारी सकाळी सहा वाजता कार्डेलिया क्रूझ मुंबईच्या ग्रीन गेटमध्ये आली. पालिकेने क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली असता त्यामधील ६६ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना पालिकेने १७ सीटर पाच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून भायखळा येथील रिचर्ड ॲण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये तसेच स्वखर्चाने हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे.