खारघरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ
बेजबाबदार नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी
खारघर, ता. ४ (बातमीदार) : खारघरमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सहा दिवसांत शहरात ३४६ बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे खारघरवासीयांनी कोरोना नियमाचे पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेकडून करण्यात आले आहे.
खारघर हा पनवेल पालिका क्षेत्रातील सर्वात मोठा नोड आहे. शहरातील आतापर्यंत २० हजार ५३५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १९ हजार ९३१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे २५८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत ३४६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी झाली होती. दर दिवशी चार ते पाच रुग्णांची नोंद होत होती. मात्र डिसेंबरअखेरीस रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खारघरमध्ये सहा दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून भाजीमार्केट, मासळीमार्केट, मॉल, बाजारपेठा, उद्यान तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणे गर्दी करण्यात येत आहे. अनेकांकडून मास्क वापरला जात नाही, वापरला तरी तो हनुवटीवर असतो. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे आणि लशींचे दोनही डोस घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रुग्णसंख्येचा आलेख
२९ डिसेंबर - २०
३० डिसेंबर - २८
३१ डिसेंबर - ४६
१ जानेवारी - ५२
२ जानेवारी - ८९
३ जानेवारी - १११
एकूण - ३४६