ब्राम्हण महासंघाच्या आर्थिक महामंडळासाठी प्रयत्न करणार
आमदार संजय केळकर यांचे आश्वासन
वसई, ता. ५ (बातमीदार) ः ब्राम्हण समाज आर्थिक, सामाजिक , शैक्षणिकदृष्ट्या मजबूत होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अल्पसंख्याक असले तरी त्यांनी आरक्षणाची मागणी केली नाही. सन्मानाने जगू द्या, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी अखिल भारतीय ब्राम्हण समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन झाले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले.
आमदार केळकर हे वाणगाव, खडखडा या ठिकाणी आयोजित अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या संमेलन बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी, कोकण प्रांत अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, अमरेंद्र पटवर्धन, मोहिनी पत्की, नंदू पावगी, सुरेंद्र मोगरे, महिला आघाडी अध्यक्षा वृषाली जोशी आदी उपस्थित होते.
संजय केळकर पुढे म्हणाले की, ब्राम्हण समाजातील खेड्यापाड्यात राहणारा नागरिक आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यांना उद्योजकतेकडे, रोजगाराकडे वळविण्यासाठी महासंघाकडून काम व्हावे. राजकारणात लोकशाहीत संख्या, सजगता पाहिली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश जोशी, सूत्रसंचालन संदीप पाठक यांनी केले, तर आभार हर्षल ओझा यांनी मानले. संमेलन यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
साडेपाच हजार जणांना रोजगार
गोविंदराव कुलकर्णी यांनी सांगितले की, देशभरातील ब्राम्हण समाज एकत्र येण्यासाठी संघटना मजबूत केली जात आहे. नव्याने एक हजार उद्योग सुरू केले जाणार आहेत. संघाकडून आतापर्यंत साडेपाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढे देखील वाटचाल अशीच सुरू राहील. यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या समाजातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला.