वाशी खाडीपुलावरून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वाचवले प्राण
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : चेंबूर भागात राहणाऱ्या एका तरुणीने मंगळवारी दुपारी वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने तिला खाडीतून बाहेर काढल्याने ती बचावली. तरुणीच्या प्रियकराने तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याने ती नैराश्यात होती. सध्या तिच्यावर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तरुणी चेंबूरमध्ये राहत असून याच भागात राहणाऱ्या एका तरुणावर तिचे प्रेम होते. प्रियकराने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र अल्पवयीन असल्याने तिने नकार दिला होता. तसेच १८ वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याबाबत सांगितले होते. प्रियकराने तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तरुणी नैराश्यात होती. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पूल गाठून तिने उडी टाकली. ही बाब काही नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी वाशी खाडी पुलावर धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक मच्छीमार महेश सुतार याच्या मदतीने तरुणीला बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. साहाय्यक पोलिस निरीक्षक यमगर यांनी तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.