डोंबिवलीतील ग्राहकपेठेला कोणाचा आशीर्वाद?
कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाईकडे दुर्लक्ष
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच कल्याण-डोंबिवली शहरात जमाव बंदी लागू करून जत्रा, उत्सवांवरही बंदी घातली आहे. त्यानुसार नुकताच डोंबिवली पश्चिमेत जत्रा भरविणाऱ्या आयोजकावर पालिकेने गुन्हा दाखल केला. मात्र पालिका कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर राजरोसपणे सुरू असणाऱ्या ग्राहक पेठ, खरेदी उत्सवाकडे दुर्लक्ष होत आहे. येथे कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नसून, सकाळ-सायंकाळी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे उभारलेले हे उत्सव नक्की कोणाच्या आशीर्वादाने चालतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गर्दी टाळा, कोरोना नियमांचे पालन करा, अशा सूचना पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत. लग्न सोहळे, अंत्यसंस्कार अशा काही कार्यक्रमांच्या ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेत कान्होजी जेधे मैदानावर आगरी-मालवणी जत्रेचा घाट घालण्यात आला होता. त्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करत आयोजकांवर गुन्हे दाखल केले. मात्र डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या बाजूलाच भव्य ग्राहक पेठ उत्सव सुरू आहे. डोंबिवलीत शिवसेना शाखेसमोर तसेच बाजी प्रभू चौकात हे उत्सव सुरू होते. बाजी प्रभू चौकातील उत्सव मंगळवारी बंद करण्यात आला असून, शिवसेना शाखेसमोर सुरू असलेल्या उत्सवाच्या ठिकाणीच येथील गाळेधारकांना हलविण्यात आले आहे.
जागामालकांची नवी शक्कल
शहरातील अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींवर प्रशासनाच्यावतीने हातोडा फिरविण्यात येतो. इमारत पाडून झाल्यानंतर पालिकेची बहुतांश जबाबदारी संपलेली असते. जागा मोकळी झाल्यानंतर येथे छोटेखानी जत्रा, खरेदी-विक्री महोत्सव, ग्राहक पेठ भरविण्यात येतात. गाळेधारकांकडून पैसा उकळण्याची ही जागामालकांनी नवीन शक्कल डोंबिवलीत लढविली आहे. त्यासाठी पालिकेची तसेच अग्निशमन दल, पोलिस यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र इथे कोणतीही परवानगी नसताना हे राजरोस सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात कोणत्याही ग्राहकपेठ उत्सवाला पालिका प्रशासनाची परवानगी देण्यात आलेली नाही.
- रत्नप्रभा कांबळे-तायडे, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी.