पोलादपूर नगर पंचायतीसाठी १७ उमेदवारी अर्ज
पोलादपूर, ता. ५ (प्रतिनिधी) : पोलादपूर नगरपंचायतचे बिगुल वाजू लागले असून स्थगित करण्यात आलेल्या ४ प्रभागांतील निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे ८ अर्ज, शिवसेनेतर्फे ५, भाजपतर्फे ४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, भाजप असे १७ जणांनी आपले नामनिर्देशन अर्ज पीठासीन अधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे सादर केले. १० जानेवारीपर्यंत अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर चार जागांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेसच्यावतीने प्रभाग क्र.२ सर्वसाधारणमधून कल्पेश मोहिते व अमित संतोष भुवड; प्रभाग क्र. ८ सर्वसाधारण महिलांमधून अनिता जांभलेकर व समिधा महाडिक; प्रभाग क्र. १० सर्व साधारणमधून शुभांगी चव्हाण व अमित संतोष भुवड; प्रभाग क्र. १४. प्रतीक्षा भुतकर व समिधा महाडिक यांनी अर्ज केले आहेत; तर भाजपतर्फे प्रभाग क्र.२ मधून संभाजी माने, ८ मधून रचना धुमाळ, १० मधून प्रतीक सुर्वे व १४ मधून अंकिता जांभलेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेतर्फे २ मधून मनोज प्रजाप्रती व साहिल जाधव, प्रभाग ८ मधून सोनाली गायकवाड, प्रभाग १० मधून प्रसाद इंगवले, प्रभाग १४ मधून प्राची सुतार यांनी अर्ज दाखल केले आहेत.