संघर्ष समिती राबवणार ‘खड्डे भरो अभियान’
भिंवडी-मनोर रस्त्याची दुरवस्था झाल्याने नाराजी
वाडा, ता. ५ (बातमीदार) ः भिंवडी- वाडा- मनोर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यातून वाट काढताना चालकांच्या नाकीनऊ येत आहे. तसेच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून यातून विशेषतः दुचाकीचालकांना वाट काढावी लागत असून त्यामुळे श्वसनाचे आजार उद्भवत आहेत. अनेकदा आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून (ता. १०) खड्डे भरण्यात येणार आहेत.
भिवंडी- वाडा- मनोर हा ६४ किलोमीटर अंतराचा रस्ता असून वाडा ते मनोर हा रस्ता काहीअंशी चांगला आहे; तर भिवंडी ते वाडा हा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबर नावालाच शिल्लक आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. राज्य महामार्ग असलेल्या रस्त्याची ही अवस्था झाली आहे. सद्यःस्थितीत हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कुठून वाहन हाकावे, असा प्रश्न चालकांना पडतो आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. अनेकदा आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने घेत नाहीत.
प्रशासनाला आश्वासनांचा विसर
सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेने नागरिक मात्र पुरते बेजार झाले आहेत. अलीकडेच भिवंडी-वाडा रस्ता संघर्ष समितीने या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घेऊन येत्या काही दिवसांत रस्ता सुस्थितीत करण्यात येईल असे आश्वासन दिले होते; मात्र या आश्वासनाचा विसर प्रशासनाला पडला आहे.